आई

 आईसाठीची संकर्षणची कविता,
आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा,
आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा,
आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय,
आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय,
बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता,
बरं तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेव्हरेट कलर कोणता?,
आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीय,
पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीय,
तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो?,
तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो,
तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरुन,
आपण मात्र बोलताना शिव्या आईवरुन,
लक्षात ठेवून सतत ती हात पसरते, नशिबापुढे, देवापुढे,
पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते,
आईची आई होऊन कधीतरी बाळांनो वागा नं,
तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा नं,
कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते,
आईने कडेवर घेतल्यावरचं आपली उंची वाढते,
उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता,
आईच्या पोटी जन्माला येतात अन् देव कुठे म्हणता,
आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी,
बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी,
नका करु स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा,
जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा.

Comments